विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करून कामाचा तगादा लावतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला होता. यात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही एकवटले होते. मात्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून आज जिल्हाधिकारी यांच्याविरोधात होणारे आंदोलन मागे घेण्यास महत्वाची भूमिका बजावली.
बंडाचे कारण?
कोणतेही काम असल्यास जिल्हाधिकारी चव्हाण काम झालेच पाहिजे, असा तगादा लावतात. कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे कामे वेळेवर कशी होणार, असा प्रश्न आहे. तसेच पाच दिवस कर्तव्य बजावूनही शनिवार, रविवार कामाचा व्याप वाढत आहे. सुट्ट्या तर बोलूच नका, सतत अपमान केला जातो,विनाकारण नोटीस बजावणे आणि इतर बाबीवरून कर्मचाऱ्यांची मानसिकता खचली आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी बंड करण्यात येणार होते. मात्र, तूर्तास तरी बंड थंड झाले आहे.