नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. सोमवारी यात रात्री उशीरा सीताबर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 355 ए, 509, 294, 506 नुसार आणि अॅट्रासिटी कायद्याच्या कलम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (2) (व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांकडे तक्रार करूनही समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याने बर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यापूर्वी मार्च 2022 व मे 19 मे 2023 दरम्यान भू्यार यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार महिला अधिकाऱ्याने केली होती. त्यावेळी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी रवींद्र भुयारी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तक्रारदार महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीला सामोरे जाणार असून, तिथे बाजू मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) या पदावर कार्यरत असलेले रवींद्र भुयार यांनी एका महिला मोटर वाहन निरीक्षकाचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पीडित महिला ही मोटर वाहन निरीक्षक असून, तिने या संदर्भात राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहाता प्रशासनाने तत्काळ दखल घेत राज्याच्या महिला तक्रार निवारण समितीला चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
नागपूर आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पीडित महिलेने कार्यालयात काम नसताना भुयार हे तासन् तास बसवून ठेवतात व स्त्रीला लज्जा वाटेल असे विनोद करतात. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील अशी वक्तव्य करतात अशी तक्रार केली होती. “माझे अनेक परपुरुषांशी लैंगिक संबंध आहे. माझा मुलगा पतीपासून नव्हे, तर दुसऱ्या पुरुषापासून झालेला आहे. त्याची डीएनए टेस्ट झाली आहे’, अशा प्रकारची वक्तव्य भुयार हे समाजात पसरवत असल्याचे तक्रारीत नमुद केले होते.
खोटी तक्रार करण्याची धमकी
कार्यालयाचे वाहन असतानाही मला घरी सोडायला सांगतात. लाँग ड्राईव्हला जाऊ असं बोलतात. चहाचे निमित्त करून घरात घेऊन जातात. रात्री उशिरापर्यंत घरी बसतात. मी नकार दिला की, लाचलुचपत विभागाकडे खोटी तक्रार करण्याची धमकी देतात. रात्री 12 वाजता, 10 वाजता, सकाळी 7 वाजता कॉल करतात. तुम्ही चाळीशीच्या वाटत नाही, कॉलेजमधील मुलगी वाटता, असे बोलतात, असेही तक्रारीत म्हटले होते.