छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शनिवारी वंदे मातरम् सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यात व्यासपीठावरच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी घाईगडबड करीत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यापुढे एक फाईल सादर केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पवार यांनी फाईलवर स्वाक्षरी करणे टाळले. त्यामुळे सत्तार नाराज होऊन सभागृहाबाहेर पडले.
एकीकडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सुरु असताना दुसरीकडे मात्र व्यासपीठावर उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री सत्तार यांच्यात एका विषयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी अचानक सत्तार यांच्या स्वीयसहायकांनी एक फाईल त्यांच्याकडे दिली. अन् सत्तार यांनी ती उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुढे केली. मात्र पवार यांनी नकार देत फाईल परत केली. यामुळे नाराज सत्तार सभागृहातून निघून गेले.