देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यास १००० लोक आत्मदहन करतील, असा इशाराच दिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीला निवडणुकीत २८८ पैकी २३५ हून अधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आधी चार दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. बिहार पॅटर्न राज्यात राबवावा अशी मागणी शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात येत होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवूनही आता तीन दिवस झाले आहेत. मात्र तरीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? यावर निर्णय झाला नाही. त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.
भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यातील अनेक नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करत आहेत. भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी तर फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यास १००० लोक आत्मदहन करतील, असा इशाराच दिला. एकाबाजूला फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या अनेक बातम्या सूत्रांमार्फत येत असताना. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या बैठकीनंतर विविध चर्चांना उधाण आले.