सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)कामे ‘लॉटरी’ पद्धतीने न मिळाल्यामुळे राज्य अभियंता संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुदीप रोडे व रमीज शेख यांनी बैठकीत गोंधळ घालत सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष, शासकीय कंत्राटदार राजू लवाडिया व सतीश देऊळकर या दोघांना धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रोडे व शेख यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवाडिया हे राज्य अभियंत्ता संघटना व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे. यापूर्वी रोडे जिल्हाध्यक्ष होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘लॉटरी’ पद्धतीने बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यासाठी ३ जानेवारीला कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रोडे व शेख यांना कोणतीही काम न मिळाल्याने ते संतापले.
लवाडिया यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनीही लवाडिया यांना लाथाबुक्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण केली. यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या देऊळकर यांनासुद्धा मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी रोडे व शेख यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रोडे यांनी लवाडिया विरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून लवाडियांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.