Ø जिल्हा कृती दलाची बैठक
Ø अडचणीत असलेल्या बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी
वर्धा :- दोन्ही पालकांना कोविड संसर्ग झाला असल्यास ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांना प्रथम नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करावा, नातेवाईक सांभाळण्यास तयार नसल्यास अशा ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक शिशुगृह व ६ ते १८ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात यावे. सदर शिशगृह व बालगृहाची माहिती सर्व कोविड हॉस्पीटल व मदत केंद्राना देण्यात यावी. यांचे संपर्क क्रमांक व बाल कल्याण समितीचा संपर्क क्रमांक तसेच १०९८ हा टोल फ्री क्रमांक दर्शनी भागावर लावण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी टास्क फोर्स बैठकीत दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाचा बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार कोवीड- १९ प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड -१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दल (Task Force) ची स्थापना करण्यात आली असून त्याची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .
या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निशांत परमा, बाल कल्याण समिती अध्यक्ष
सचिन आष्टीकर, जिल्हा माहिती अधिकारी, मनिषा सावळे, डॉ. संगिता भिसे, संदिप नखाते, जिल्हा साथरोग अधिकारी, पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे, उपमुख्याधिकारी शैलेश बिराजदार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल डी. माहुरे, परिविक्षा अधिकारी के. बी. रामटेके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, माधुरी भोयर, उपस्थित होते.
जिल्हयामध्ये ० ते ६ वयाच्या बालकांसाठी बालकांची काळजी घेण्यास संत गाडगेमहाराज शिशुगृह, लक्ष्मीनगर,वर्धा तसेच ६ ते १८ वर्ष वयाच्या बालकांसाठी शासकीय मुलांचे निरिक्षणगृह / बालगृह, गोपुरी रोड, वर्धा निश्चितकरण्यात आलेले आहे. सदर शिशगृह व बालगृहाची माहिती सर्व कोविड हॉस्पीटल व मदत केंद्राना देण्यात यावी.
दोन्ही पालकांना कोविड संसर्ग झाला आहे किंवा दोन्ही पालकांचा कोविड मुळे मृत्यु झाला आहे अशी बालके शिशृगृह व बालगृहात दाखल करण्यात आल्यास त्यांची योग्य ती काळजी घेण्यात यावी याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सर्व संस्थांना देवून त्याप्रमाणे कार्यवाही होत आहे किंवा नाही याची खात्री करावी.
बाल कल्याण समिती बालकांची तातडीने गरज लक्षात घेवून बालकांच्या पुनर्वसनासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ३७ प्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी. नातेवाईक, पालक उपलब्ध असतील तर प्रथम त्यांचेकडे अथवा बालगृहात या बालकांना ठेवण्यासाठी योग्य आदेश दयावे. ज्या बालकांचे दोन्ही पालक कोविड मुळे मृत्यु पावले आहेत, अशा बालकांची माहिती बाल कल्याण समिती व चाईल्ड लाईन नंबर १०९८ वर देण्यात यावी. स्थानिक चाईल्ड लाईन बालकांना भेट देवून त्यांच्या स्थितीबद्दल माहिती घेईल व
आवश्यकतेनुसार चाईल्ड लाईन प्रतिनिधी २४ तासाच्या आत बालकांना मदत करतील.
कोविड मुळे अनाथ झालेल्या बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करेल. यासाठी जिल्हाधिकारी यांना बाल संरक्षणात काम करणा-या सर्व यंत्रणांबरोबरच स्थानिक पोलिस, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल कल्याण समिती, चाईल्ड लाईन सर्व मदत करतील.
सर्व हॉस्पीटलमध्ये शिशुगृह व बालगृह यांचे संपर्क क्रमांक व बाल कल्याण समितीचा संपर्क क्रमांक तसेच १०९९ हा टोल फ्री क्रमांक दर्शनी भागावर लावण्यात यावे. तसेच हॉस्पीटलने अशा बालकांच्या पालकांना या बालगृहाबाबतची माहिती दयावी. अशा अडचणीत सापडलेल्या पालकांबाबत हॉस्पीटलने जिल्हा कृती दलाच्या समन्वयक अधिकाऱ्यास अवगत करावे.
संस्थेतील बालकांसाठी समुपदेशनाची सोय करावी. दररोज किती बालकांचे समुपदेशन करण्यात आले याची नोंद ठेवण्यात यावी. ज्या बालकांना अधिक मानसोपचाराची गरज असेल त्यांची यादी तयार करुन त्यांचे स्वतंत्रपणे समुपदेशन करण्यात यावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
तसेच गाव बाल संरक्षण समिती, आरोग्य केद्र, ग्रामपंचायती याठिकाणी प्रचार प्रसार साहित्य लावुन सदर विषयाबाबत जाणीवजागती करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
जिल्हा प्रशासनाने इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी बाल कल्याण समिती व चाईल्ड लाईन नंबर १०९८ तसेच यासाठी महिला व बाल विकास विभागाने सुरु केलेल्या हेल्पलाईन मदत कक्षाचे क्रमांक ९८५०२५३६९६, ९९२११८०७४४, ९४२१७५०३५४ हे सर्वत्र लावण्यात यावे.प्रचार प्रसार साहित्याचा अधिकाधिक ठिकाणी दर्शनी भागावर लावण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.