वर्धा :प्रतिनिधी सचिन पोफळी :- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण विश्व साजरी करणार असून गांधींच्या या कर्मभूमीत २ ऑक्टोबर२०२० रोजी वर्धेत दीपोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या जयंती निमित्याने गांधी विचार त्यांचे जीवन दर्शन आजच्या पिढीला पोचविण्यासाठी लेझर, साऊंड शो च्या माध्यमातून दाखविण्याची व्यवस्था आणि या महामानवाचे आश्रम जागतिक प्रेरणा स्थळ शासनाने करावे अशी मागणी गांधी तत्वज्ञान प्रचारक समिती व जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आज झालेल्या या पत्रकार परिषदेतून केली.
अग्निहोत्री कॉलेज, वर्धा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले की, गांधीजींच्या कर्मभूमीत देश विदेशातून हजारो पर्यटक सेवाग्राम येथे येतात. त्यांचे जीवन कार्य जवळून पाहण्यासाठी येतात. येथे येणार्या लोकांसाठी गांधी जीवन दर्शन दाखविण्यासाठी लेझर शो ची व्यवस्था करण्यासाठी व्यवस्था करावी ज्यात गांधी जीवन प्रत्यक्ष रुपात दर्शक अनुभव करेल, त्यांचे जीवन ओळखू शकेल, त्यांची अनुभूती घेवू शकेल म्हणून वर्धा येथे गांधी जीवन दर्शनसाठी लेझर साऊंड शो च्या माध्यमातून दाखविण्याची व्यवस्था असावी.
गांधी आश्रम हे पवित्र स्थळ आहे. वर्धा-सेवाग्राम एक सामाजिक धाम आणि राष्ट्रीय तीर्थ मानल्या जाते. गांधीजीना महामानव, युगपुरुष मानले आहे. गांधी सारख्या महामानवाचे आश्रम हे समाजाभिमुख बनविण्यासाठी अद्यापही प्रयत्न झालेले नाही. १५० व्या जयंती चे औचित्य साधून आश्रमाला जागतिक संदेश देणारे स्थळ निर्माण केले पाहिजे. सेवाग्राम केवळ एक हेरीटेज वास्तूच नाही तर आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थळ सुद्धा आहे. जेथून विश्वाला सत्य, अहिंसा, शांती चा संदेश सातत्याने प्राप्त होते.
आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद ची स्थापना करण्यात यावी. सेवाग्राम जगात मानवीय व सामाजिक समस्या अहिंसात्मक, शांती च्या मार्गाने सोडविण्याचे केंद्र बनले पाहिजे म्हणून सेवाग्राम येथे एक जागतिक परिषदेची स्थापना झाली पाहिजे. या परिषदेला यु.एन. ओ च्या धर्तीवर विश्व मान्यता मिळावी यासाठी आवश्यक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर या परिसराचे निर्माण व्हावे.
वर्धा सेवाग्राम पवनार हे एक पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित केले गेले पाहिजे. सेवाग्राम, पवनार, राष्ट्रभाषा प्रचार समिती, मगन संग्रहालय, हिंदी विश्वविद्यालय, बोर अभयारण्य, महाकाली मंदिर, सिद्धिविनायक मंदिर केळझर, विश्वशांती स्तूप, गीताई मंदिर, लक्ष्मिनारायण मंदिर असे अनेक प्रसिद्ध तीर्थ व पर्यटन स्थळ वर्धा जिल्ह्यात आहे. या सर्वाना जोडून पर्यटनाची शृंखला बनविल्यास वर्धा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधांसोबत गांधी विनोबा यांच्या विचारांची अनुभूती आणि प्रेरणा मिळेल.
या चार मुद्यांना घेवून गांधी प्रेमी नागरिकांनी शासनाकडे मागणी केली असून गांधी तत्वज्ञान प्रचारक समिती द्वारे महामहीम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या कडे केली आहे. यासाठी लोकचळवळ होणे आवश्यक असल्याचे पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला समितीचे सचिव पियुष पटेल, अनिल नरेडी, शशिकांत बागडदे, जनसंपर्क अधिकारी प्रमोद गिरडकर, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र मुंधडा, प्राचार्य डॉ. राजकिशोर तुगनायात, प्राचार्य प्रफुल्ल दाते व अभिजित रघुवंशी उपस्थित होते.