Breaking News

आजचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे : शरद पवार, नाना पटोलेंनंतर उद्धव ठाकरेंकडूही भूमिका स्पष्ट

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र बंदच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (२३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“उच्च न्यायालयाने हा निर्णय ज्या तत्परतेने दिला त्याच तत्परतेने महाराष्ट्रात जे गुन्हे घडत आहेत. त्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता दाखवावी. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा लागतो. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र, त्यामध्ये काही अवधी लागू शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता वेळ नाही. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की, उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. मात्र, महाराष्ट्रभर आम्ही महाविकास आघाडीची सर्व नेते आणि कार्यकर्ते हातामध्ये काळे झेंडे घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही घडलेल्या घटनांचा निषेध करणार आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

 

नाना पटोले काय म्हणाले?

 

महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. यानंतर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाना पटोले म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही मात्र आम्ही एकत्र बसणार आहोत. यासंदर्भातील सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत. आम्ही बंद करणार नाही, जनतेनं बंद केल्यास संबंध नाही”, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

 

शरद पवारांनी काय आवाहन केलं होतं?

 

“बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे”, असं शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं होतं.

About विश्व भारत

Check Also

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

चीफ जस्टिस का आभारी हूं कि उन्होंने गणेश जी को तारीख नहीं दी! उद्धव ठाकरे

चीफ जस्टिस का आभारी हूं कि उन्होंने गणेश जी को तारीख नहीं दी! उद्धव ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *