खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर झालेल्या लोकायुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता.
चौथ्या अतिरिक्त विशेष जिल्हा सत्र न्यायालयातून सर्च वॉरंट घेऊन दि. ८ जानेवारी रोजी तहसीलदारांशी संबंधित सहा ठिकाणी लोकायुक्तांनी धाड टाकली होती. त्यांच्याकडे उपलब्ध मालमत्तांच्या स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत आढळून आले. कर्नाटक लोकायुक्त विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. त्यानुसार महसूल विभागाचे सचिव मुख्तार पाशा एच. जी. यांनी गायकवाड यांच्या निलंबनाचा आदेश बजाविला आहे. त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवली आहे. कित्तूरचे तहसीलदार रवींद्र हादीमणी यांच्याकडे खानापूर तहसीलदार पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.