लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा केलेल्या 723 कारवाईत सर्वाधिक 173 प्रकरणे एकट्या महसूल विभागाची आहे. त्यामुळे पोलीस विभागालाही महसूलने मागे टाकले आहे. यामध्ये वर्ग 3 च्या लोकसेवकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस विभागात लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा समज आकडेवारीने फोल ठरविला आहे. लाचखोरीत पोलिस नव्हे, तर महसूल विभाग सध्या आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याखालोखाल पोलिसांचा नंबर लागतो. केवळ पुरुष लोकसेवकांनीच नाही, तर महिला लोकसेवकांचाही लाचखोरीत समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबरपर्यंत राज्यात 723 ‘ट्रॅप’ करण्यात आले. त्यामध्ये 1024 लोकसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भ्रष्टाचार व अपसंपदेच्या 21 प्रकरणांमध्ये 59 लोकसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
महसूल विभागातील 241अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल गृह विभागातील 224, पंचायत समिती 87, महावितरण 66, महानगरपालिका 71, जिल्हा परिषद 64, वन विभाग 26, शिक्षण विभाग 51, कृषी विभाग 23, सार्वजनिक बांधकाम विभाग 14, समाज कल्याण विभागातील 11 अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पुणे विभाग आघाडीवर
राज्यात लाचखोरीत पुणे विभाग सर्वांत पुढे आहे. गेल्या वर्षंभरात झालेल्या 155 सापळा कारवायांमध्ये पुणे विभागातील 223 अधिकारी-कर्मचारी अडकले आहेत. लाचखोरीत दुसर्या क्रमांकावर नाशिक, तर तिसर्या क्रमांकावर औरंगाबाद आहे.
असे आहेत लाचखोर
*वर्ग 1 : 74
*वर्ग 2 : 123
*वर्ग 3 : 558
*वर्ग 4 : 44
*इतर : 71
*मध्यस्थी करणारे : 154