राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षकपदी महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) ६५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक म्हणून नेमणूक केली जाते. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे यापासून ते मतदान पार पाडणे. त्यानंतर मतमोजणी होईपर्यंत या अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडावे लागते. २० ऑक्टोबर ते ३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात असणार नाहीत. विविध विभागांत असणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्य प्रशासनाचा वेग मंदावणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्यात ४१५ भाप्रसे अधिकाऱ्यांचा संवर्ग आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३५० च्या आसपास भाप्रसे अधिकाऱ्यांची संख्या आहे. यापैकी केंद्रीय प्रतिनियुक्ती, आंतरराज्य प्रतिनियुक्ती याचा विचार केला तर राज्याच्या प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या आणखी कमी आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांकडे कामाचा व्याप असल्याचे चित्र आहे.