मनोज जरांगेविरोधात मराठा समाजाचे आंदोलन

मनोज जरांगे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करून बार्शीचे भाजपपुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोपांचे सत्र सुरू केले असतानाच आता मराठा आंदोलकांकडूनदेखील बार्शीत जरांगे यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण चळवळीतील नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले असून, त्यांनी जरांगे यांना ११ प्रश्न विचारले असून, त्यांचे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.

बार्शी शहरात शिवसृष्टीजवळ सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनात अण्णासाहेब शिंदे यांच्यासोबत अन्य मराठा कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. त्यांनीही जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या हेतूविषयी शंका घेणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांतील काही प्रश्न असे – महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून जरांगे यांनी लोकसभेवेळी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी जरांगेंच्या मदतीने लोकसभेला पाठिंबा मिळवत यश मिळवले. मात्र, या पक्षांनी अद्याप मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर का केलेली नाही? लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आणण्यात मदत केली. या सर्व ३१ खासदारांनी समाजाची मते घेत विजय मिळवला; तरी त्यातील कोणीही अद्याप मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर का केलेली नाही?

आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना राजकीय भूमिका घेत जरांगे यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. यातून उद्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर ते मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देणार आहेत का? ते आरक्षण देणार असल्यास कसे आणि किती दिवसांत देणार? त्याबाबतचे काही आश्वासन जरांगे यांना आघाडीने दिले आहे का? आंदोलनामुळे मिळालेले आरक्षण रद्द झाल्यास आणि ओबीसींमधून आरक्षण मिळण्यात अडचणी आल्यास त्याची जबाबदारी जरांगे घेणार आहेत का? समाजात मुस्लीम-मराठा वाद पूर्वीपासून आहे. त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे ३०० हून अधिक ओबीसींबरोबर वैमनस्य निर्माण होण्याची वेळ आली आहे. समाजातील अन्य सर्व जातींबरोबर तयार झालेल्या या वादास जबाबदार कोण?

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पूर्वी मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण मिळवून दिले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र, सत्ताबदलानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. यास कोण जबाबदार आहे? त्याबाबत जरांगे यांची भूमिका काय आहे? या प्रकारचे ११ प्रश्न या वेळी आंदोलकांकडून जरांगे यांना विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे जरांगे यांनी अद्याप दिलेली नसल्याचे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले. ही उत्तरे देणे त्यांनी टाळल्यास त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमस्थळी याबाबत मराठा समाजाचे आंदोलक त्यांना विचारणा करणार असल्याचेही शिंदे यांनी या वेळी जाहीर केले.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *