चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक
महानगराचा पारा 46.2, तर ब्रम्हपुरी 45 अंश सेल्सिअस
चंद्रपूर,
यंदा मे महिन्याचा तडाखा महानगरासह जिल्हावासियांना पहिल्यांदाच जाणवला. कोरोनाच्या सावटात मे हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागला. शनिवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवले. भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 46.2, तर ब्रम्हपुरी येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद असून, विदर्भात चंद्रपुरात सर्वाधिक होती.
शनिवारी दुपारी महानगरात फेरफटका मारला असता तप्त उन्ह चटके बसत होते. त्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोनामुळे संचारबंदी असली, तरी काही अंशी नागरिक रस्त्यावर पडायचे. पण, शनिवारला रस्ते निर्मनुष्य दिसू लागले होते. स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावर प्रत्येक प्रवासी झाडांच्या आडोशाला आसरा घेताना दिसला.संचारबंदीमुळे शितपेयांचे दुकाने सकाळी 11 वाजेपर्यंत असतात. याही वेळेस शितपेयांच्या दुकानांत नागरिकांची गर्दी दिसू लागली.
‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात गाजतो. सर्वाधिक तापमानाची नोंद अनेकदा चंद्रपूर जिल्ह्यात होत असते. यंदा एप्रिल महिन्यात सर्वाधिक 43 अंश तापमानाची नोंद झाली होती. शनिवारी अकोला 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती 41.6, गडचिरोली 41, गोंदिया 42.5, नागपूर 43.9, तर वर्धा जिल्ह्यात 42.5 अंश तापमानाची नोंद घेतल्या गेली.