वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाआघाडी सरकारने कामाचे श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. असा आरोप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे.
आमदार डॉ. भोयर म्हणाले की, भाजपच्या शासनकाळात तत्कालीन वित्तमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला कोटयवधी रूपयांचा निधी दिला. या निधीतून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. याकरिता वेळोवेळी निधी देण्यात आला. सोबतच लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी दिलेल्या सूचनांना प्राथमिकता देत त्यांचाही आराखडयात समावेश करीत निधी तरतूद करण्यात आली. परंतु, महाविकास आघाडीने या निधीला कैची लावली. यामुळे विकास कामे थांबली आहे. जे काम सुरू करण्यात आले होते, ते अपूर्ण आहेत. राज्य सरकारने अस्थिर स्थिती पाहता श्रेय घेण्यासाठी गांधी जयंतीला अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. आज ज्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यातील एकही काम पूर्ण झाले नाही, असेही आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.