वर्धा जिल्हा प्रतिनिधी,सचिन पोफळी :- येथील वीरशैव लिंगायत समाजासाठी मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्यावी याकरीता आज दि.1 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी श्री.विवेक भीमनवार यांना शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून येथील वीरशैव मोक्षधाम जागेची प्रक्रिया रखडली आहे. प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.पण मंजूरी नंतर व निधी उपलब्ध झाल्या नंतर सुद्धा काम रखडल्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकारी यांना शिवा संघटनेच्या वतीने स्मरणपत्र देण्यात आले. या स्मरणपत्रातून वीरशैव मोक्षधाम करिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
” शिवा ” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी “ शिवा ” महाराष्ट्र वीरशैव युवक संघटनेच्या मागण्यापैकी वीरशैव लिंगायत समाजासाठी गाव तेथे स्मशान भूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणिबाबत 2001 पूर्वीपासून सतत केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्र्यांनी सदर मागणी दिनांक 09/02/2001 रोजी शासन जि.आर.काढून मान्य केलेली असून सदरच्या मागणीच्या पूर्ततेसाठी संबंधितांना आदेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत.मा.मुख्यमंत्री महोदयांच्या आश्वासनाची दखल घेऊन वीरशैव समाजाच्या मागणीनुसार त्यांना स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही संबंधित सर्व जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ करावी असे लेखी आदेश अप्पर सचिव महाराष्ट्र शासन सुशी साटविलकर यांनी निर्गमित केले होते.
दिनांक 09/02/2001 रोजी शासन जि.आर.काढण्यात आला असून ” शिवा ” वीरशैव मोक्षधाम योजना आज पावतो वीरशैव समाजासाठी वर्धा येथे स्मशानभूमी करिता जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही या निवेदनाद्वारे शासन ज.आर.नुसार गाव तेथे स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांची असल्यामुळे त्वरित वर्धा येथे वीरशैव समाजासाठी कायमस्वरूपी शिवा मोक्षधाम उपलब्ध करून देण्यात यावी करिता निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.यावेळी पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष उद्धव गाडेकर, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पट्टेवार, जिल्हा संघटक गजानन बाजारे, महिला आघाडी अध्यक्ष मेघा हिंगमीरे, जिल्हा सचिव किरण पट्टेवार,विजय पट्टेवार जेष्ठ पदाधिकारी,अविनाश कोमलवार जेष्ठ पदाधिकारी,रणदीप आवते, विजय पुणेवार शहर अध्यक्ष, सविता ढोले महिला आघाडी शहर अध्यक्ष उपस्थित होते.