हा तर शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय – निखिल कडू अध्यक्ष निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती
आर्वी :- निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत गावातील १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता मिळालेल्या ३५ कोटी रूपयांतून पुनर्वसित गावांचे चहरे पालटण्याची आशा होती. यासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला, पाणीपुरवठाची कामे मजीप्राला, विद्युत रोषणाई व दुरुस्तीचे काम महावितरणला, इतर कामे जिल्हा परिषद वर्धाला देण्यात आली होती. निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने हि कामे दर्जेदार व्हावी यासाठी पहीले मजीप्राने पाणीपुरवठाची कामे झाल्यावर डांबरीकरणची कामे करावी याबाबत वेळोवेळी सुचित केले होते. असे झाले देखील परंतु आर्वी तालुक्यातील भादोड भाईपूर पुनर्वसित गाव याला अपवाद ठरले आहे.
या गावात आधी डांबरीकरणची कामे करण्यात आली आणि आता मजीप्राची पाणी पुरवठा यंत्रणेची कामे सुरू आहेत. हि कामे जेसीबीने करण्यात येत आहे. या कामा करीता गावा अंतर्गत असलेल्या रोडच्या साईडला पाईपलाईन टाकण्यासाठी जवळपास एक मीटर खोल नाली करून एचडीपीई पाईप टाकण्यात येत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात डांबरीकरण रस्ता मातीमय झाला आहे. रस्त्याच्या एकाकडेला हि पाईपलाईन टाकण्यात येत असल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घरांना पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी झालेला रस्ता खोदावा लागणार किंवा आडवे बोअर जागोजागी मारावे लागणार. एवढे होऊनही आधी झालेल्या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होणार.
या बाबतीत निखिल कडू यांनी सांगितले की, मजीप्राला वारंवार सांगुनही रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे होण्या अगोदरच पाणीपुरवठा योजनेची कामे भादोड भाईपूर पुनर्वसन मध्ये का केले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व मजीप्रा या दोन्ही विभागात तांत्रिक दृष्ट्या सधन असुनही हा हलगर्जीपणा केला गेला असुन इतर पुनर्वसित गावांबाबत भादोड भाईपूर गावासारखी निर्माण केलेली स्थिती इतर कोणत्या गावात ओढावलेली आहे याचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या विरूद्ध कठोर आंदोलन करण्यात येईल.